नागपूर: शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये गुरुवारी सकाळी नागपूर ते गडचिरोली उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरवरून गडचिरोली येथील सुरजागड प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी हा बिघाड पायलटच्या समयसूचकतेमुळे वेळीच लक्षात आल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंत्री उदय सामंत गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजता नागपूरहून सुरजागडच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने निघणार होते. मात्र, हेलिकॉप्टर सुरू करून टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटला तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. पायलटच्या प्रसंगावधानामुळे तातडीने उड्डाण थांबवण्यात आले, ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात काही काळ खळबळ उडाली होती.
या तांत्रिक बिघाडामुळे मंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्याला उशीर झाला. घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, पायलटले वेळीच लक्ष दिल्याने आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आम्ही टेक ऑफ घेतला नाही. या अनपेक्षित प्रसंगानंतर मंत्री महोदय रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे रवाना झाले. दरम्यान, उड्डाणापूर्वीच्या तांत्रिक तपासणीत हा बिघाड का निदर्शनास आला नाही, याबाबत चौकशी करण्याची मागणी स्थानिक शिवसैनिकांकडून केली जात आहे.



