संगमेश्वर / नियाज खान : संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये २५ गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी गणेश फरसाण मार्टचे मालक रहाटे बंधू, कोंड-असुर्डे येथील प्रशांत पोवळे तसेच कुरधुंडा येथील इरफान नेवरेकर यांनी योगदान दिले. त्यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेट्या, रंगपेट्या, पेन यांसह विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेचे सचिव प्रा. धनंजय शेट्ये व मान्यवर इरफान नेवरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये व मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांच्यासह शिक्षक व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
प्रशालेचे माजी विद्यार्थी दिनेश हरिभाऊ अंब्रे यांची उपसंपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये व मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अंब्रे यांनी आपल्या मनोगतातून बालपणी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना शिक्षकवृंदांनी केलेली शैक्षणिक मदत आजही स्मरणात असल्याचे सांगितले. आई-वडील, शिक्षक तसेच सद्गुरू सुदिक्षाजी महाराज यांनी दिलेल्या शिकवणीतून सेवाभावाची प्रेरणा मिळाली असून, राष्ट्रासाठी समर्पित भावनेने सेवा कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी क्रिशा इंदानी व स्वप्नाली टकले यांनी स्कॉलरशिप तसेच एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल नेवरेकर व पोवळे यांच्या वतीने त्यांना शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोर्लेकर सर यांनी केले, तर प्रशालेचे पर्यवेक्षक दळवी सर यांनी श्री. नेवरेकर व श्री. दिनेश अंब्रे यांचे आभार मानले. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संगमेश्वरातील पैसा फंड प्रशालेत २५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
Leave a Comment





