रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणातील ठेकेदारांना मोठा दिलासा मिळाला असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी आणि चिपळूण विभागासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही विभागांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, निधीअभावी रखडलेल्या कामांच्या बिलांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी या निधी वितरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही काळापासून देयके रखडल्यामुळे ठेकेदार वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता, परिणामी नवीन कामे हाती घेण्याबाबत ठेकेदारांकडून सावध भूमिका घेतली जात होती. आता निधी उपलब्ध झाल्याने प्रलंबित बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऐन सणासुदीच्या काळात दिलासा मिळाल्याने ठेकेदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे यांसह विविध शहरांतून हजारो चाकरमानी कोकणात दाखल होत असल्याने रस्त्यांवर वाहनांचा मोठा ताण येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या निधीच्या माध्यमातून राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील आवश्यक डागडुजी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे वेगाने मार्गी लावली जाणार आहेत. यामुळे चाकरमान्यांचा कोकणातील प्रवास अधिक सुखकर व खड्डेमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.






