रत्नागिरी: अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र लबाडी व फसवणूक करून बेकायदेशीररीत्या अवैध ठरविल्यामुळे कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन’ (ऑफ्रोह) संघटना आक्रमक झाली आहे. या अन्यायाविरोधात संघटनेच्या वतीने आज, सोमवार ७ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र निदर्शने व आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून ऑफ्रोहच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत धरणे आंदोलन व घोषणाबाजी करण्यात येणार आहे. या निदर्शनांमध्ये जिल्ह्यातील बाधित व अन्यायग्रस्त कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणार आहेत.






