ब्लास्टिंग करून रघुवीर घाटातील महाकाय दरड हटवली; ४० तासांनंतर खेड-सातारा संपर्क अखेर पूर्ववत

Gramin Varta
83 Views

खेड: खेड-सातारा मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रघुवीर घाटात कोसळलेली महाकाय दरड अखेर ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवत शनिवारी उशिरा हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीशी तुटलेला सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क पूर्ववत प्रस्थापित झाला असून प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रघुवीर घाटात अचानक ही दरड कोसळली होती. महाकाय दगड आणि प्रचंड मातीचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर आल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक क्षणात पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून शुक्रवारपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी व पोकलेनच्या साह्याने रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम तातडीने सुरू केले होते. मात्र, दरडीतील काही अजस्त्र दगड यंत्रांच्या साहाय्याने हलवणेही अशक्य बनले होते.

अखेर परिस्थितीवर मात करण्यासाठी शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नियंत्रित ब्लास्टिंगचा आधार घेण्यात आला. स्फोट घडवून ते अजस्त्र दगड फोडण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. तब्बल चाळीस तास चाललेल्या या आव्हानात्मक मोहिमेनंतर शनिवार सायंकाळी उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

Total Visitors :
4820059
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *