अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत

Gramin Varta
202 Views

राजापूर/ तुषार पाचलकर:  तालुक्यातील अनुस्कुरा घाटात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

मध्यरात्री दरड कोसळल्याची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस कर्मचारी अमर मोरे, रामदास पाटील, स्वप्निल घाटगे, अर्शद मुल्ला आणि जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रवाशांच्या तसेच बुधवारी बाजारामध्ये भाजी विकण्यासाठी येणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या मदतीने पोलिसांनी दरड हटवण्याचे काम हाती घेतले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमांनंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील एकेरी वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

दरम्यान, अनुस्कुरा घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कोणतीही पूर्व खबरदारी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडेझुडपे छाटणे आणि तुंबलेली गटारे साफ करणे यांसारखी कामे करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असून, मध्यरात्री एवढी मोठी दरड कोसळल्यानंतरही पोलीस दल घटनास्थळी येऊन मदतकार्य करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अद्यापही गाफील राहिल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4598440
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *