राजापूर अप्पर तहसीलदार कार्यालय: सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; आता अंतिम निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष

Gramin Varta
722 Views

पाचल/ तुषार पाचलकर: राजापूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालय निश्चितीबाबत आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शांततापूर्ण वातावरणात पार पडली. कार्यालयाचे ठिकाण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत विविध ग्रामपंचायतींची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली होती.

या सुनावणीदरम्यान प्रशासनाने उपस्थित सरपंच आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींना आपली मते मांडण्याची पूर्ण संधी दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या दृष्टीने कोणते ठिकाण अधिक सोयीचे ठरेल आणि त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, याबाबत थेट प्रश्न विचारून भूमिका स्पष्ट करून घेतली. सुनावणीच्या निमित्ताने प्रांत कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडली.

काही व्यक्तींकडून वैयक्तिक स्वरूपाच्या टिप्पण्या झाल्याची चर्चा असली तरी, त्याचा अधिकृत कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. प्रशासनाने सर्वांचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले असून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. सुनावणीनंतर झालेल्या चर्चेत पाचलच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर मते मांडण्यात आल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. आता सादर करण्यात आलेल्या हरकती, सुनावणीत नोंदविण्यात आलेली मते आणि प्रशासकीय निकष यांचा विचार करून प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4576144
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *