राजापूर / तुषार पाचलकर : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, तालुक्यातील पाचल येथील दिवाळवाडी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. धरणावरून वाहणारे शुभ्र पाणी, चारही बाजूंना पसरलेली हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली असून दिवाळवाडी धरण परिसराने पावसाळी पर्यटनाचे रूप धारण केले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढीस लागल्याने हा परिसर पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.
धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले ही स्वागतार्ह बाब असली, तरी पर्यटकांची वाढती संख्या पाहता केवळ तेवढेच पुरेसे ठरणार नाही. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच ओव्हरफ्लोच्या पुलावर मजबूत रेलिंग व संरक्षण कठडे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय धोकादायक ठिकाणी योग्य चेतावणी व इशारा फलक लावणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करणे आणि आपत्कालीन बचावाचे साहित्य तयार ठेवणे आवश्यक आहे. या उपाययोजना केल्यास हे ठिकाण अधिक सुरक्षित आणि एक आदर्श पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकेल.
दिवाळवाडी धरणाचा पर्यटनस्थळ म्हणून नियोजनबद्ध विकास केल्यास त्याचा मोठा फायदा स्थानिक पातळीवर होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकरी, महिला बचत गट, स्थानिक युवक आणि लघु व्यावसायिकांना रोजगाराच्या विविध नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच भविष्यात सर्व आवश्यक शासकीय परवानग्या आणि कडक सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करून या ठिकाणी नौकाविहार अर्थात बोटिंगची सुविधा सुरू करण्याचीही मोठी संधी निर्माण होऊ शकते.
या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पाचलने ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत दिवाळवाडी धरणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी ग्रामसभेत सर्वानुमते अधिकृत ठराव मंजूर केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव व आवश्यक पत्रव्यवहार संबंधित शासकीय विभागांकडे करण्यात आला आहे. सन २०२५ मध्ये सादर करण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रस्ताव सध्या संबंधित विभागाकडे प्रलंबित असून, यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जावा. या निर्णयामुळे दिवाळवाडी धरणाच्या पर्यटन विकासाला गती मिळून कोकणातील एक प्रमुख पर्यटन केंद्र विकसित होईल, अशी तीव्र अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक व्यक्त करत आहेत.





