माचाळच्या निसर्ग-संस्कृतीच्या रक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल; माचाळ परिवर्तन सेवा संस्थेच्या वतीने पर्यटन नियमावली फलकाची उभारणी

Gramin Varta
236 Views

लांजा- तालुक्यातील माचाळ गावाची दिवसेंदिवस वाढत असलेली पर्यटन ओळख आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन माचाळ परिवर्तन सेवा संस्था (रजि.) यांच्या वतीने रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी गावात पर्यटन नियमावलीचा भव्य फलक उभारण्यात आला. माचाळचा निसर्ग, संस्कृती, श्रद्धा, परंपरा आणि ग्रामसंस्कार यांचे जतन करत शिस्तबद्ध व जबाबदार पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.

माचाळ हे केवळ पर्यटनस्थळ नसून समृद्ध निसर्ग, स्थानिक संस्कृती, धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि ग्रामजीवनाची वेगळी ओळख जपणारे गाव आहे. पर्यटन वाढत असताना या सर्वांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यटकांनी गावातील नियमांचे पालन करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, पर्यावरणाचे संवर्धन करावे, तसेच धार्मिक स्थळे, स्थानिकांच्या भावना आणि ग्रामसंस्कृतीचा आदर करावा, या व्यापक उद्देशाने पर्यटन नियमावलीचा फलक उभारण्यात आला आहे. सन २०१८ पासून सामाजिक, ग्रामविकास आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या माचाळ परिवर्तन सेवा संस्थेने भविष्यातील वाढते पर्यटन लक्षात घेऊन माचाळमध्ये जबाबदार पर्यटनाची दिशा निश्चित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. नियमावलीच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, धार्मिक स्थळांचा सन्मान, गावातील शांतता व शिस्त तसेच ग्रामसंस्कृतीचे जतन याबाबत पर्यटकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

“पर्यटकांचे मनापासून स्वागत आहे; मात्र माचाळचा निसर्ग, संस्कृती आणि ग्रामसंस्कार जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सन २०२६ मध्ये संस्थेची नव्याने कार्यकारिणी उभारण्यात आली असून या उपक्रमावेळी Adv. अजय विठ्ठल पाटील, श्री. दीपक गंगाराम पाटील, श्री. महादेव शंकर भोसले, श्री. नितेश शांताराम पाटील, श्री. विकास महादेव पाटील, श्री. परशुराम पांडुरंग पाटील, श्री. अशोक रामचंद्र मांडवकर, श्री. विजय जयराम मांडवकर, श्री. संजय सावजी गोवळकर, श्री. किशोर दत्ताराम पाटील, श्री. संजय शांताराम मांडवकर आणि सौ. अस्मिता अशोक मांडवकर यांची उपस्थिती होती. तसेच श्रीधर राघो पाटील, बुधजी सखाराम भातडे, दत्ताराम धोंडू पाटील, कृष्णा बाळू मांडवकर, राजेश शांताराम मांडवकर, सोमा अनाजी भातडे, अजय जयराम पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ व सहकारी उपस्थित होते.

माचाळमध्ये पर्यटन वाढावे, स्थानिकांना रोजगार व आर्थिक संधी मिळाव्यात आणि गावाच्या विकासाला चालना मिळावी, ही संस्थेची भूमिका आहे. मात्र पर्यटनाच्या वाढीसोबत माचाळची माती, माणसं, संस्कृती, परंपरा आणि निसर्ग यांची ओळख कोणत्याही परिस्थितीत हरवू नये, यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. माचाळच्या निसर्गाचे संवर्धन, ग्रामसंस्कृतीचे जतन आणि जबाबदार पर्यटनाचा संदेश देणारा हा पर्यटन नियमावली फलक भविष्यातील पर्यटन व्यवस्थापनासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.

Total Visitors :
4717923
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *