रत्नागिरी : वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला असून, लवकरच आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. मनसेचे जिल्हा पदाधिकारी आणि वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसांत मनसे आपली भूमिका स्पष्ट करेल आणि ती ग्रामस्थांच्या बाजूने असेल, असे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मनसेचे पदाधिकारी अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर आणि इतर प्रमुख कार्यकर्ते यांनी वाटद येथे संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गवाणकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गवाणकर यांनी एमआयडीसीला होणारा विरोध का आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. जमिनींच्या खरेदी-विक्रीमध्ये कोणाचा हात आहे, प्रशासन कशाप्रकारे स्थानिकांना वेठीस धरत आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली.
या बैठकीत मनसेने स्पष्ट केले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. कोकण हा निसर्गाने समृद्ध असल्याने येथे पर्यटनावर आधारित विकास होणे आवश्यक आहे, अशी त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर आजची चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरली.
मनसे पदाधिकाऱ्यांनी संघर्ष समितीला खात्री दिली की, यापुढील काळात हा लढा एकत्रितपणे लढला जाईल. संघर्ष समितीचे अध्यक्ष सहदेव वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मनसेच्या या भूमिकेमुळे स्थानिकांना मोठा पाठिंबा मिळाला असून, आंदोलनाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.