रत्नागिरी: प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घालायचीच असेल तर ती संपूर्ण देशभरात लागू केली पाहिजे. प्रदूषणमुक्त हवेचा सर्वांचा अधिकार अबाधित राखला पाहिजे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण स्वागतार्ह आहे, असे मत येथील ज्येष्ठ विधीज्ञ आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सिंगापूर, आयर्लंड, हंगेरी आदी देशात फटाकेबंदी आहे. प्रदूषणाचा प्रश्न विचारात घेत फटाक्यांबाबतचे धोरण ते संपूर्ण देशभर लागू केले पाहिजे. फटाके बंदी प्रकरणात एप्रिलमध्ये न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी! प्रदूषणमुक्त हवेचा सर्वांना अधिकार, असे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे.
दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर चिंता व्यक्त केली. याबाबत अॅड. विलास पाटणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देशातील उच्चभ्रू नागरिक दिल्लीत आहेत, म्हणून आपण दिल्लीला विशेष वागणूक देता काम नये. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा विचार करून संपूर्ण देशभरात फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण सूचना सरन्यायाधिशांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना परवान्यांची यथास्थिती राखण्याचे निर्देश दिले आहेत.
फटाक्यांसाठी देशव्यापी धोरणाची गरज – ज्येष्ठ विधीज्ञ विलास पाटणे
