ऐतिहासिक क्षणा चे मालगुंड , गणपतीपुळे तसेच परिसरातील ग्रामस्थ बनले साक्षीदार
तरवळ/अमित जाधव: नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मालगुंड प्रशालेचा सुवर्ण पदक विजेता खेळाडू संगम सुयोग चव्हाण याचे दिनांक १६ रोजी मालगुंड येथे भव्य स्वागत करण्यात आले. विजयी मिरवणूक काढून त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीचे समस्त मालगुंड आणि गणपतीपुळे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे भव्य स्वागत केले.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड या संस्थे साठी आणि विद्यालय व ज्युनिअर कॉलेज साठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे . मालगुंड एज्युकेशन सोसायटी आणि बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज च्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा हा क्षण आहे . या ऐतिहासिक क्षण ज्यांच्या मुळे निर्माण झाला तो प्रशालेचा विद्यार्थी संगम चव्हाण आणि त्याचे मार्गदर्शक प्रशिक्षक रूपेश तावडे यांच्या स्वागतासाठी भव्य अशा मिरवणूकीचे मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. ढोल, ताशा, लेजीम, सोबत झांज पथका च्या समवेत मालगुंड जीवन शिक्षण प्राथमिक शाळा ते मालगुंड प्रशाला असा हा भव्य दिमाखदार सोहळा जल्लोषात पार पडला.
संगम चव्हाण या विद्यार्थ्याने १४ वर्षे वयोगटामध्ये राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होऊन सुवर्ण पदक जिंकले आणि त्याची निवड २७ व २८ रोजी कोहिमा नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. हा ऐतिहासिक क्षण आणि त्याचे सर्व स्तरातून स्वागत व्हावे आणि या राष्ट्रीय खेळाडूवर शुभेच्छा चा वर्षाव करण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थी सुद्धा रस्त्याच्या कडेला उभे राहिले आणि त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला व त्याचे जोरदार स्वागत केले. एका सजवलेल्या गाडीत संगम चव्हाण आणि त्याचे मार्गदर्शक प्रशिक्षक रूपेश तावडे हे दोघेही या शुभेच्छा स्वीकारत होते. त्याच बरोबर ग्रामस्थ सुद्धा या विजयी मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. ते सुद्धा या गुरू आणि शिष्याचे उस्फूर्तपणे स्वागत करीत होते. मालगुंड ,गणपतीपुळे, तसेच रत्नागिरी तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अतिशय भूषणावह आणि अभिमानाची बाब ठरली आहे.
संगम चव्हाण या विद्यार्थ्याने जे उज्ज्वल यश मिळविले आहे त्यासाठी त्याला प्रशिक्षक रूपेश तावडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली आहे. त्याच बरोबर संगम चव्हाण याचे आई वडील यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे.
या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यासाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर ,सचिव विनायक राऊत ,खजिनदार संदीप कदम ,संचालक रोहित मयेकर, किशोर पाटील, मुख्याध्यापक बिपीन परकर ,पर्यवेक्षक उमेश केळकर , दीप्ती मयेकर, पोलिस पाटील अमोल राऊत, विनायक सावंत , सन्मान मयेकर, सुशील दुर्गवळी श्री. पाटील संगम चव्हाण चे वडील सुयोग चव्हाण, तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील नागरीक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भव्य विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी संगम चव्हाण आणि त्याचे मार्गदर्शक प्रशिक्षक रूपेश तावडे यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.