सावर्डे:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे आयोजित चिपळूण तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला. या नेत्रदीपक यशामुळे सावर्डे विद्यालयाच्या अनेक खेळाडूंना आता जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.
या स्पर्धेत सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत बहुतांश पदके आपल्या नावावर केली. 14 वर्षांखालील मुलींच्या गटात कस्तुरी घाग हिने 100 मीटर धावण्यात, तर इच्छा राजभर हिने 400 आणि 600 मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, याच गटाच्या 4 x 100 मीटर रिले संघानेही प्रथम क्रमांक मिळवला. मुलांच्या 14 वर्षांखालील गटात संस्कार घाणेकर (लांब उडी-द्वितीय) आणि अर्णव जोंधळे (उंच उडी-तृतीय) यांनी यश मिळवले.
17 वर्षांखालील गटात मुलींनीही दमदार कामगिरी केली. मुक्ता भुवड (400 मीटर प्रथम), हुमेरा सय्यद (800 मीटर व 1500 मीटर प्रथम), वेदिका बामणे (उंच उडी प्रथम, तिहेरी उडी द्वितीय) यांनी लक्षवेधी यश संपादन केले. त्यांचा 4 x 400 मीटर रिले संघही प्रथम आला. मुलांच्या गटात पृथ्वी राजभर याने 800 मीटर आणि 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
19 वर्षांखालील गटात सावर्डे विद्यालयाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. मुलांच्या गटात अर्ष अडरेकर (गोळाफेक प्रथम), अजिंक्य भायजे (थाळीफेक प्रथम) आणि आदित्य गमरे (क्रॉसकंट्री प्रथम) यांनी सुवर्ण कामगिरी केली. 4 x 400 मीटर रिले संघानेही प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात प्रचिती भारती (100 मीटर प्रथम), सलोनी नाचणकर (400 मीटर प्रथम), श्रावणी हुमणे (गोळाफेक प्रथम) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर त्यांचे 4 x 100 आणि 4 x 400 मीटर रिले संघ प्रथम आले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
सावर्डे विद्यालयाच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सचिव महेशजी महाडिक तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. “सह्याद्रीचा झेंडा पुन्हा एकदा जिल्हास्तरावर फडकणार आहे,” असे गौरवोद्गार काढत त्यांनी खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.