GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: रायपटण येथे अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; तीन आरोपी ताब्यात, १९ जनावरांची सुटका

Gramin Varta
61 Views

रत्नागिरी – गणेशोत्सवादरम्यान गोवंश वाहतूक आणि कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत लांजा उपविभागात दोन वाहनांमधून १९ गोवंशाची अवैध वाहतूक करताना तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, १९ जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. व्ही. बी. महामुनी यांनी गणेशोत्सव काळात गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक गुरुवारी (२८ ऑगस्ट) लांजा उपविभागात गस्त घालत असताना, त्यांना ओणी ते पाचल मार्गे गोवंश वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीनुसार, पोलिसांनी रायपाटण येथे पहाटे ३.३० वाजता वाहनांची तपासणी सुरू केली. पहाटे ५.५५ वाजता पोलिसांनी संशयावरून महिंद्रा कंपनीची जिनीओ मॉडेलची (MH-04-FP-6424) आणि पाठोपाठ आयशर प्रो-१०५९ मॉडेलची (MH-07-X-1511) ही दोन वाहने थांबवली. तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये क्रूरतेने दाटीवाटीने बांधलेली एकूण १९ गोवंश जनावरे आढळून आली. त्यांना खाण्यासाठी चारा किंवा पिण्यासाठी पाणी न देता, केवळ दोरीने बांधून वेदना होतील अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची तपासणी केली नव्हती. चालकांनी त्यांची नावे विनायक मनोहर भोईटे (वय ३८, रा. पांगरी, निपाणी, जि. बेळगावी, कर्नाटक) आणि समीर बाळासो मुजावर (वय ३१, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी सांगितली. चौकशीदरम्यान त्यांनी ही जनावरे तबरेज चांदनिया ठाकूर (रा. पाटवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्याकडून आणल्याचे कबूल केले.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६, महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ आणि मोटार वाहन कायदा १९८८ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी दोन्ही वाहनांसह सुमारे २० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. व्ही. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने बजावली आहे. यात श्रेणी पो.उनि. ओगले, स.पो.फौ. गोटे, पो.हवा. झोरे, पालकर, राजवैद्य, कदम, सवाईराम, शेट्ये आणि चा.पो.काँ. कांबळे यांचा समावेश होता.

Total Visitor Counter

2647732
Share This Article