GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : गुहागरमध्ये ७ हजारांची लाच घेताना बांधकाम उपअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Gramin Varta
394 Views

गुहागर : तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीच्या कामाचे ‘रनिंग’ बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या गुहागर पंचायत समितीतील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता संजय सळमाखे याला मंगळवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत सळमाखे याला अटक करण्यात आली आहे.

वेळंब ग्रामपंचायतीच्या पत्राशेडच्या कामाचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे ‘रनिंग’ बिल काढण्यासाठी सळमाखे याने सात हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शुक्रवारी संबंधित काम करणाऱ्या उपठेकेदाराकडील कागदपत्रांवर सही करण्यास त्याने नकार देत दोन वेळा केबिनबाहेर पाठवले. हे ‘रनिंग’ बिल असून अंतिम बिलावेळी पैसे देऊ नकोस, मात्र आत्ता कोणत्याही परिस्थितीत सात हजार रुपये दे, अशी मागणी त्याने तक्रारदाराकडे केली होती.

या प्रकाराबाबत तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी पैशांच्या देवाण-घेवाणीवर सापळा रचण्यात आला. कार्यालयात कागदपत्रांवरील उर्वरित सही घेण्यासाठी तक्रारदार गेल्यानंतर उपअभियंता सळमाखे याने पुन्हा ग्रामसेवकाची सही नसल्याचे सांगत बाहेर पाठवले. नंतर सही आणल्यानंतर ‘रक्कम आणली का?’ अशी विचारणा करून त्याने पाच हजार रुपये स्वीकारले. रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने सळमाखे याला ताब्यात घेऊन अटक केली.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Total Visitor Counter

3388097
Share This Article