GRAMIN SEARCH BANNER

कसबा-संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची अप्पर मुख्य सचिव विकास खरगे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
152 Views

संगमेश्वर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कसबा-संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि परिसराच्या विकासाला आता अधिक गती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव श्री. विकास खरगे आणि वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी आज कसबा-संगमेश्वर येथे प्रत्यक्ष भेट देऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला साजेसे, भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यासह येथील पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक सरदेसाई वाडा परिसराचे संवर्धन, जिर्णोद्धार व विकास करण्याबाबत महाराष्ट्र शासन अत्यंत सकारात्मक आहे. या अनुषंगाने स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

या ऐतिहासिक जागेचा विकास व्हावा यासाठी यापूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन कसबा-संगमेश्वरचे ऐतिहासिक महत्त्व त्यांच्यासमोर प्रकर्षाने मांडण्यात आले होते. या मागणीची दखल घेत अजितदादा पवार यांनी स्वतः या स्मारकाच्या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे या स्मारकासाठी आवश्यक असणारा निधी, योग्य नियोजन आणि प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत आग्रही भूमिका मांडण्यात आली होती. मा. अजितदादा पवार यांनीही या विषयाचे गांभीर्य ओळखून विशेष लक्ष दिले असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. या भव्य स्मारकाच्या माध्यमातून केवळ इतिहास जतन होणार नसून भावी पिढीला त्यातून मोठी प्रेरणा मिळणार आहे. तसेच संगमेश्वर परिसराच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विकासालाही यामुळे मोठी चालना मिळणार असून, हे स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठीच्या अमूल्य योगदानाचा गौरवशाली वारसा म्हणून ओळखले जाईल.

Total Visitor Counter

3391844
Share This Article