GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदर विकासकामांचे उद्या भूमिपूजन

रत्नागिरी: अनेक वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी, दि. २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या वतीने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

भूमिपूजन मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे आणि उद्योग, मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित राहणार आहेत.

मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सचिव डॉ. रामास्वामी एन., रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे अधिकारी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

मिरकरवाडा हे महत्त्वाचे बंदर असूनही अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामामुळे त्याचा विकास रखडला होता. मात्र, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने २७ जानेवारी २०२५ रोजी या बंदरावरील जुनी अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसर आणि त्यामुळेच विकासाचा मार्ग मोकळा झाला. मिरकरवाडा बंदर १९८६ साली बांधून पूर्ण झाले होते. त्यानंतर अनधिकृत बांधकामामुळे येथील विकास रखडला. २०१३ मध्ये मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही झाले होते, परंतु अनेक कामे अपूर्ण राहिली होती. मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे आता ही अपूर्ण कामे पूर्णत्वास जाणार असल्याने रत्नागिरीतील मत्स्य व्यवसायाला झळाळी मिळणार आहे. या विकासामुळे राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

Total Visitor Counter

2455994
Share This Article