जिल्ह्यातील २४४६ सरकारी शाळांमध्ये ‘मोफत डिजिटल शिक्षण’
रत्नागिरी: राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि ‘खान अकॅडमी इंडिया’ यांच्यात नुकताच एक महत्त्वाचा पाच वर्षांचा करार झाला आहे. या करारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल २४४६ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार गणित आणि विज्ञानाचे डिजिटल शिक्षण आता मोफत मिळणार आहे.
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकण्याची संधी मिळेल. डिजिटल माध्यमांतून शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सगळ्या मुलांना शिक्षणाची समान संधी मिळावी, याच ध्येयाने खान अकॅडमी इंडिया आणि महाराष्ट्र सरकार एकत्र आले आहेत. आता राज्यातल्या सरकारी शाळांमधील मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित, चांगल्या दर्जाचे डिजिटल शिक्षण साहित्य मोफत मिळणार आहे. यासाठी ५ वर्षांचा करार झाला आहे, आणि यावेळी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माननीय शिक्षणमंत्री श्री. दादासाहेब भुसे आणि माननीय राज्यमंत्री श्री. पंकज भोयर उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या मदतीसह सरकारी शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत, खान अकॅडमीचे डिजिटल साहित्य राज्यातल्या ६२,००० पेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये वापरले जाईल. या कार्यक्रमांतर्गत, राज्यातील विद्यार्थ्यांना खान अकॅडमीचे जागतिक दर्जाचे, राज्य अभ्यासक्रमाशी पूर्णपणे संलग्न असलेले गणित आणि विज्ञानाचे साहित्य मराठी आणि इंग्रजी भाषेत आयुष्यभर विनामूल्य उपलब्ध होईल. हे साहित्य सगळ्या शाळा, शिक्षक आणि मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचावे, यासाठी खान अकॅडमी इंडिया आणि शिक्षण विभाग एकत्र मिळून काम करतील. एवढंच नाही, तर खान अकॅडमीच्या मदतीने मुलं घरीही अभ्यास करू शकतील. यासाठी पालकांनाही यात जोडून घेण्याचा प्रयत्न असेल.
या कार्यक्रमावेळी बोलताना माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या भागीदारीमुळे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी शिक्षण जास्त सोपं, रंजक आणि सगळ्यांपर्यंत पोहोचणारं होईल. यामुळे मुलांची उत्सुकता वाढेल, त्यांचा अभ्यासाचा पाया पक्का होऊन प्रत्येक मुलाला आपली पूर्ण क्षमता वापरता येईल.” याच विचाराला पुढे नेत, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रणजित सिंह देओल म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या मदतीने विज्ञान आणि गणितासारखे विषय पुढे नेण्यासाठी आमचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. खान अकॅडमीसोबत काम करून आम्ही शिक्षकांना नवीन साधनं देऊ, पालकांना सहभागी करू आणि प्रत्येक मुलाला वर्गात आणि घरी उत्तम प्रतीचं शिक्षण मिळेल याची खात्री करू.”
खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक,स्वाती वासुदेवन म्हणाल्या, “महाराष्ट्रामध्ये आमची सुरुवात ४८८ शाळांपासून झाली होती, आणि आता आम्ही संपूर्ण राज्यात पोहोचायला तयार आहोत. शिक्षणामुळे फक्त एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास होतो, यावर आमचा विश्वास आहे आणि ही भागीदारी त्याचाच एक पुरावा आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या भागीदारांसोबत मिळून आम्ही असं भविष्य घडवत आहोत, जिथे कुठल्याही घरातून आलेल्या प्रत्येक मुलाला जगातलं सर्वोत्तम शिक्षण मिळेल आणि तो यशस्वी होईल, हे पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.”
या संपूर्ण उपक्रमाच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आहेत. सरकारी शिक्षण पद्धतीत कोणते मोठे बदल शक्य आहेत, हे दाखवणारी ही भागीदारी एक धाडसी पाऊल आहे. खान अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मद्वारे जागतिक दर्जाचे शिक्षण साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाईल, तसेच हे साहित्य विद्यार्थ्यांच्या स्व-अध्ययनासाठी (self-paced learning) आणि शिक्षकांना वर्गात शिकवण्यासाठी, अशा दोन्ही प्रकारे उपयुक्त ठरेल. प्रत्येक मुलामधील सुप्त क्षमता जागृत करणे, हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी राज्य शासनासोबत मिळून, शिक्षकांना आवश्यक ती सर्व साधने, प्रशिक्षण आणि पाठिंबा पुरवला जाईल. यासोबतच, एक उज्ज्वल आणि सर्वांना समान संधी देणारे भविष्य घडवण्यासाठी तयार असणारी विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यावर भर दिला जाईल. महाराष्ट्रातील खान अकॅडमीच्या या कार्यक्रमाला शेल इंडिया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉग्निझंट फाउंडेशनचा पाठिंबा आहे.