GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत मुलांच्या किरकोळ वादातून दोन कुटुंबांत जोरदार राडा; घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण, पती-पत्नी गंभीर

Gramin Varta
431 Views

रत्नागिरी: शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बुधवारी (ता. ४) रात्री मुलांच्या किरकोळ वादातून दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सना खलीद मजगांवकर (वय ३१) व त्यांचे पती खलीद करीम मजगांवकर असे जखमींची नावे आहेत. याप्रकरणी हनिफ आदम मेमन (वय ३७) व खुशबू हनिफ मेमन (वय ३२) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सना मजगांवकर यांनी संशयित खुशबू मेमन यांना त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारला. यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला. काही वेळानंतर हनिफ मेमन व खुशबू मेमन यांनी मजगांवकर यांच्या घरात घुसून हाणामारी केली. हनिफ मेमन यांनी लोखंडी रॉडने खलीद मजगांवकर यांच्या डोक्यात मारहाण केली, तर त्यांना वाचविण्यास गेलेल्या सना मजगांवकर यांच्या तोंडावर मारहाण करून नखांनी ओरबाडले.

या घटनेत शिवसेनेचे माजी विभागप्रमुख खलीद मजगांवकर व त्यांची पत्नी सना जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
फिर्यादी सना मजगांवकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलिस अमलंदार करीत आहेत.

Total Visitor Counter

3370295
Share This Article