संगमेश्वर: संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा, संगमेश्वर येथील विद्यार्थिनी प्रणिता प्रविण कांबळे हिने एसएससी परीक्षा २०२६ मध्ये ९६.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. प्रणिताने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीने यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
प्रणिता ही मुळात एका शिक्षक कुटुंबातील असून शिक्षणाचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले आहे. तिचे वडील कोळंबे येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत, तर आई न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम कसबा येथेच सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. घरातील शैक्षणिक वारसा आणि पालकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे प्रणिताने अभ्यासात सुरुवातीपासूनच चिकाटी ठेवली होती. पालकांनी निर्माण केलेले अभ्यासाचे वातावरण आणि प्रणिताची मेहनती वृत्ती यामुळेच तिला हे यश संपादन करता आले आहे.
तिच्या या यशात शाळेच्या मुख्याध्यापिका आस्मा जुवळे यांच्यासह सर्व विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांनी करून घेतलेली तयारी आणि प्रणिताने दिलेला प्रतिसाद यामुळेच हे यश अधिक उजळून निघाले आहे. प्रणिताच्या या कामगिरीबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी तिचे मनापासून अभिनंदन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रणितावर सध्या सर्वच माध्यमांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन उत्तुंग भरारी घेण्याचा प्रणिताचा मानस असून, तिच्या या यशाने अन्य विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.







