GRAMIN SEARCH BANNER

लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात ८ रोजी सर्वपक्षीय आंदोलन

Gramin Varta
117 Views

माजी खासदार हुसेन दलवाई यांची माहिती

चिपळूण (प्रतिनिधी) : लोटे परशुराम औद्योगिक वसाहत एवढीच मर्यादित न राहता पनवेलपासून थेट रत्नागिरीपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर विनाशकारी आणि आरोग्यास घातक केमिकल कंपन्या मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या आहेत. या कंपन्यांमधून निर्माण होणारे विषारी पाणी व घनकचरा वाशिष्ठी, जगबुडी, सावित्री यांसारख्या नद्यांमध्ये सोडला जात असून त्यामुळे कोकणातील नागरिकांना कर्करोगासारखे असाध्य आजार जडत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला.

इटलीमधील मिटेनी (Miteni) या केमिकल कंपनीत तयार होणाऱ्या पीफास(PFAS –फॉरएव्हर केमिकल्स) मुळे इटलीमध्ये साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले होते. या केमिकल्सचे विघटन होत नाही किंवा ते नष्ट करता येत नाहीत. परिणामी इटली सरकारने मिटेनी कंपनीवर टाळे ठोकलेच, शिवाय कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना तुरुंगातही डांबले. मात्र हीच मिटेनी कंपनी बंद झाल्यानंतर तिची संपूर्ण यंत्रसामग्री जशीच्या तशी कोकणात आणण्यात आली, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. ही यंत्रसामग्री लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केली असून, मिटेनी कंपनीतील एक अधिकारी या कंपनीत थेट डायरेक्टर म्हणून नेमण्यात आल्याचा दावाही आंदोलकांनी केला. लक्ष्मी ऑरगॅनिक लिमिटेड ही वासुदेव गोयेंका यांची कंपनी असून तिच्या संचालक मंडळामध्ये मिटेनी कंपनीचे माजी डायरेक्टर असलेले अँटोनिया नॉरडेनी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

पिफास हे केमिकल मानवी रक्तात गेल्यास कॅन्सर, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे तसेच हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय प्रजनन क्षमतेवरही त्याचे अत्यंत घातक दुष्परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे असताना या कंपनीला परवानगी देताना या सर्व बाबींकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी तातडीने बंद करण्यात यावी या मागणीसाठी दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.

या आंदोलनावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून हा विषय राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येईल, अशी माहिती माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून जनतेच्या आरोग्याचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षीय मतभेद, हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अशोक जाधव, उदय घाग, श्रीमती सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदूलकर, संकेत साळवी, महादेव चव्हाण, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Visitor Counter

3073036
Share This Article