रत्नागिरी: गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून विद्यार्थिनींना संरक्षण देण्यासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद शाळा निवेंडी खालची, भगवतीनगर येथे नुकताच HPV लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या आरोग्य उपक्रमाला शाळेतील विद्यार्थिनींच्या पालकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना सकारात्मक सहकार्य केले.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किशोरवयीन मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही HPV (Human Papillomavirus) लस विद्यार्थिनींना मोफत देण्यात आली. लसीकरण सुरू असताना, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पालकांशी संवाद साधला. त्यांनी लसीकरणाचे महत्व, तिची सुरक्षितता आणि भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून होणारे दीर्घकालीन आरोग्य फायदे याबाबत अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. या माहितीमुळे पालकांचे शंका निरसन झाले आणि त्यांनी या ‘आरोग्य कवचा’साठी आपल्या मुलींना पुढे केले.
या महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालगुंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, आरोग्य सहाय्ययिका श्रीम. सीमा पाडवी, CHO श्रीम. अक्षता शिर्षेकर, आरोग्य सेविका श्रीम. दीपा गावडे, आरोग्य सेवक श्री. सुरेश अंबुरे, आशा व अंगणवाडी सेविका यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
आरोग्य विभाग आणि शाळा प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम केवळ लसीकरण कार्यक्रम न राहता, समाजात आरोग्य आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता निर्माण करणारा एक आदर्शवत कार्यक्रम ठरला आहे.