कुळे गावाच्या समृद्ध संस्कृतीत, आणि निसर्गाच्या सान्निध्यात हरवले
देवरूख : निसर्गरम्य कुशीत वसलेले ‘कुळे’ गाव नुकतेच एका विशेष अनुभवाचे साक्षीदार ठरले. अमेरिकेतील परदेशी अभ्यासकांचा एक शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने या गावात दाखल झाले आणि क्षणातच ते गावाच्या समृद्ध संस्कृतीत, निरलस ग्रामीण जीवनशैलीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात हरवले.
या पाहुण्यांनी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीची पाहणी करताना येथे राबवले जाणारे शिक्षणाचे उपक्रम, बालसंगोपनाची पारंपरिक पद्धत, आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे प्रयत्न यांची सखोल माहिती घेतली. त्यांना खास आकर्षण ठरले ते अंगणवाडीतील रंगीत भिंती, शिक्षण सुलभ करणारे खेळ, आणि सेविकांचे प्रेमळ योगदानाने भारावले.
या दौऱ्यात सांस्कृतिक दर्शन घडविण्याची संधीही त्यांना मिळाली. गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्यांना ‘वारी’चे अनोखे अध्यात्मिक दर्शन घडले. संत परंपरा, विठोबा भक्ती, वारकरी संप्रदायाचा समाजमनावरचा प्रभाव आणि पंढरपूर यात्रेचे विशेष महत्त्व त्यांनी जाणून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर जाणवणारे आश्चर्य आणि आनंद हेच या दर्शनाचे प्रत्यक्ष साक्ष होते.
अंगणवाडी सेविका साळवी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुण्यांना ग्रामदैवत श्री नवलादेवीचे मंदिर, तसेच मंदिराजवळील देवराईचे पर्यावरणीय व धार्मिक महत्त्व याविषयी सखोल माहिती दिली. गावकऱ्यांचे साधे पण मनापासूनचे जीवन, पारंपरिक राहणीमान, आदरातिथ्य, आणि निसर्गाशी असलेले सख्य यांमुळे पाहुणे भारावून गेले.
गावकऱ्यांनीही आपल्या परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. स्थानिक महिलांनी फुलांची सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि आदरातिथ्य याने त्या दिवशी कुळे गावाचा आत्मा उजळून निघाला.
हा दौरा केवळ शैक्षणिक नव्हता, तर एक संस्कृतीचा सेतू ठरला. विविध भौगोलिक पार्श्वभूमीतील दोन समुदायांनी अनुभवलेली ही भेट मानवी मूल्यांची आणि आपुलकीची ओळख बनून राहिली. परदेशी पाहुण्यांनी निघताना फक्त ‘गाव’ पाहिलं नव्हतं, त्यांनी भारताच्या हृदयाची धडधड अनुभवली होती.
परदेशी पाहुणे संगमेश्वरमधील शाळा आणि संस्कृतीच्या प्रेमात; गावकरी, विद्यार्थ्यांसह लुटला मनमुराद आनंद

Leave a Comment