राजापूर : उन्हाळे येथे तालुक्यातील पहिल्या मतिमंद निवासी कार्यशाळेचे उद्घाटन वाटूळ येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम चव्हाण यांच्या हस्ते झाले.
कार्यशाळा चालवण्यासाठी स्व. पार्वती गुणाजी कांबळी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यशाळेची स्थापना मतिमंद विद्यार्थ्यांचे शिक्षण, कौशल्यविकास आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. स्थानिक स्तरावर अशी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक कुटुंबांवरील आर्थिक आणि मानसिक भार कमी होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी आत्माराम चव्हाण म्हणाले, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अशी कार्यशाळा ही काळाची गरज आहे. मतिमंद मुलांमध्ये सुप्त गुण असतात, त्यांना योग्य संधी आणि दिशा दिल्यास तेही समाजात सन्मानाने जगू शकतात. ही कार्यशाळा म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे.
सरपंच सौ. साक्षी सोड्ये, पोलिस पाटील प्रकाश पुजारी, गावचे गावकर, गणपत सोड्ये, राजाराम पुजारी, सामाजिक कार्यकर्ते व वडवली विकास सेवा सोसायटीचे सचिव सुरेश सूद, शिक्षक आणि पालक मंगेश प्रभुदेसाई, प्रतीक नाटेकर, हसन मापारी इत्यादी उपस्थित होते. कार्यशाळा केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतील सुधारणा आणि आत्मनिर्भरतेवर भर देणार आहे.
राजापूर : उन्हाळे येथे मतिमंद निवासी कार्यशाळेचे उद्घाटन

Leave a Comment