चिपळूण : शहरातील डेरवण रोडवरील एका बांधकाम साईटवर वेल्डिंगचे साहित्य बाजूला करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल शांताराम कालमणकर (वय ३८, रा. सावर्डे) हे डेरवण रोडवरील साईव्हिला चाळ समोर असलेल्या सिद्धेश्वर प्लाझा बिल्डिंगच्या बांधकाम साईटवर काम करतात. त्याच ठिकाणी आरोपी सचिन विलास महाडिक (वय ३५, रा. डेरवण) वेल्डिंगचे काम करतो.
बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास, महाडिकने आपले वेल्डिंगचे सामान बिल्डिंगच्या मोकळ्या आवारात ठेवले होते. कालमणकर यांनी महाडिकला ते सामान बाजूला करण्यास सांगितले. याचा राग आल्याने महाडिकने कालमणकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू नको, असे सांगितल्यावर महाडिकचा राग अनावर झाला. त्याने जवळच असलेला लोखंडी रॉड उचलून कालमणकर यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात कालमणकर यांच्या डाव्या हाताच्या बोटाला, उजव्या पायाला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, महाडिकने त्यांना ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी कालमणकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, महाडिकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.