GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल प्रदूषणाबाबत जिल्हा प्रशासनाने अहवाल मागितला

Gramin Varta
124 Views

रत्नागिरी : जयगड येथील जिंदाल कंपनीच्या वादग्रस्त गॅस टर्मिनल विरोधात जिल्हा प्रशासनाने प्रदुषण मंडळ, सागरी महामंडळ व जिल्हा कृषी विभागाकडून तात्काळ अहवाल मागविला आहे. या सर्व विभागांकडून लवकरच पहाणी करण्यात येवून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रदूषणाबाबत आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारण्याकरिता खोटे प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. या आरोपाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने प्रदूषणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्या आहेत. तसेच गॅस टर्मिनलबाबतच्या प्रमाणपत्राचा अहवाल महाराष्ट्र सागरी महामंडळाकडुन मागविण्यात आला आहे.

रत्नागिरीत झालेल्या हक्कयात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिंदाल कंपनीमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत आवाज उठविला. तसेच याबाबत जिंदाल कंपनीच्या विरोधात निवेदनही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत अहवाल सादर करण्याच्या सुचना संबधित विभागाना दिल्या आहेत. जिंदाल वीज कंपनीतून बाहेर पडणा-या राखेमुळे आंब्याच्या झाडावर बसून आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

त्याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांना पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच जयगड किल्ल्याला जे तडे गेलेले आहेत, त्याची देखील पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना निवासी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला करण्यात आल्या आहेत. हे सर्व अहवाल आल्यावर जिंदाल कंपनी विरोधात जिल्हा प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार याकडे आता जयगडसह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2647915
Share This Article