अर्जुना प्रकल्प लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या नियोजनावर लोकनृत्य, लोककलेच्या माध्यमातून जनजागृती
तुषार पाचलकर / राजापूर
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या वतीने अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ‘जल हे विश्व’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पाचल-तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये पार पडणार आहे.
लोककला आणि लोकनृत्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन, त्याचा लाभ, तसेच जलसंधारणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा अर्जुना मध्यम प्रकल्प आता पूर्णत्वास जात असून, या प्रकल्पामुळे करक (अंशतः) आणि पांगरी (पूर्णतः) या गावांचे विस्थापन झाले आहे. समस्त प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात आली असून, त्यांचे चार ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंनी बंदिस्त पाईपलाईनद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना भात शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणावर काम मार्गी लागले असून, अर्जुना प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन कसे करावे, याबाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थित राहणार असून, परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
ही माहिती रत्नागिरी पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी दिली.
‘जल हे विश्व’ प्रबोधन कार्यक्रम पाचल-तळवडे येथे
