गुहागर/ तुषार पाचलकर: रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजू घातले आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गट आणि पडवे पंचायत समिती गणात यंदा मोठी चुरस पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
पडवे पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस (इंदिरा काँग्रेस) या सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, या चौरस लढतीत यंदा प्रथमच काँग्रेस पक्षाचे श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेली अनेक वर्षे गुहागर तालुक्यात काँग्रेसला आलेली मरगळ दूर करण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
मूळचे कुडली बंदरवाडी गावचे रहिवासी असलेले आणि सध्या ठाणे-कळवा येथे वास्तव्यास असणारे मिलिंद चाचे यांनी गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मुंबईत राहत असूनही त्यांचा आपल्या गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आजही वैयक्तिक संपर्क कायम आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय आणि मंत्रालयीन अधिकाऱ्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा उपयोग ते गावकऱ्यांच्या कामांसाठी करतात. मंत्रालयासह इतर कोणत्याही ठिकाणी काम अडल्यास गावकऱ्यांकडून सर्वात आधी मिलिंद चाचे यांचे नाव पुढे येते. सर्वांशी आपुलकीने आणि आदराने वागणारे चाचे लोकांना आपलेसे वाटतात.
सत्ता नसतानाही त्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. गेल्या चार वर्षांपासून गणेश चतुर्थी आणि शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी त्यांनी ठाणे/बोरिवली – कुडली बंदरवाडी या एसटी बसेसची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. तसेच, कोळी समाजाच्या (खारवी समाज) जमिनीच्या अडचणींबाबत निकष बदलण्यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. गुहागर तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जेवर लाईट उपलब्ध व्हावेत यासाठी ते आग्रही आहेत. स्वामी भक्तांसाठी त्यांनी कुडली बंदरवाडी ते अक्कलकोट तसेच कुडली-सावर्डे रेल्वे स्टेशन मार्गे चिपळूण अशा बसेसही सुरू केल्या आहेत.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या गरजू रुग्णांना मदत करणे, तरुणांना छोटी-मोठी नोकरी मिळवून देणे यांसारख्या कामांतही त्यांनी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने स्वतःची स्पर्धा परीक्षा अकादमी सुरू करावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय, नुकतीच त्यांनी काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील खाडी व समुद्रकिनारी असलेल्या ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून ‘कल्पवृक्ष’ योजना सुरू करण्याची मागणी केली आहे, ज्यावर ग्रामविकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या सर्व कामांमुळे आणि जनसंपर्कामुळे श्री. मिलिंद चाचे पडवे पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांची ही उमेदवारी पडवे गणातील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण करणार यात शंका नाही. आता मतदार ‘काम करणारा’ उमेदवार निवडतात की ‘शोबाजी’ करणाऱ्यांना कौल देतात, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
गुहागर: ‘पडवे’ गणात यंदा चुरस! काँग्रेसचे ‘मिलिंद चाचे’ मैदानात, निष्क्रियतेला आव्हान देणार?





