धुळीने नागरिक हैराण ; श्वसनाचे विकार वाढीस
अजय सावंत/संगमेश्वर : तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस राई-भातगाव मार्गाची अवस्था दिवसेंदिवस भयावह बनत चालली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, पसरलेली लाल माती आणि दोन ते तीन वर्षांपासून रखडलेले पुलाचे अर्धवट काम यामुळे हा मार्ग आता अपघातांना खुले आमंत्रण देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, कामगार,ग्रामस्थ तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.मात्र प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वारांचे हाल बेहाल झाले आहेत. रस्त्यावर साचलेल्या लाल मातीतून वाहने घसरत असून अनेकदा चालक थोडक्यात बचावल्याच्या घटना घडत आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही पुलाचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण चिखलमय होण्याची भीती व्यक्त केली जात असून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच उपोषणाचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.







