GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा तीव्र तुटवडा; पर्यटकांच्या ओघामुळे पंपांवर वाहनांच्या अडीच-तीन तास लांब रांगा

Gramin Varta
35 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सीएनजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून वाहनचालकांना प्रचंड हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, परिणामी चिपळूण, रत्नागिरी शहर, राजापूर, खेड आणि लोटे यांसारख्या महत्त्वाच्या भागांतील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी शहरात तर परिस्थिती अधिकच गंभीर असून अनेक पंपांवर जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येमुळे उपलब्ध सीएनजीचा साठा अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी गॅस भरण्यासाठी वाहनचालकांना चक्क अडीच ते तीन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही पुरेसा गॅस मिळेलच याची शाश्वती नसल्याने स्थानिक वाहनचालकांसह पर्यटकांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांचे यामुळे मोठे हाल होत असून, या टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्य बाजारपेठा आणि महामार्गालगतच्या पंपांवर ही गर्दी अधिक असल्याने वाहतुकीवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. शरीरात इंधन असतानाही केवळ गॅस उपलब्ध नसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या कडेला थांबून असल्याचे विदारक दृश्य सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

Total Visitor Counter

3368293
Share This Article