GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : चाफे येथील अतिरिक्त जमीन वाटप घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोकण अपर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त

Gramin Varta
119 Views

रत्नागिरी:तालुक्यातील चाफे गावात शासनाने भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अतिरिक्त जमिनीच्या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी कोकण विभागाच्या अपर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही समिती गठीत करण्यात आली असून चौकशीला सुरुवात झाली आहे.

कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात नुकतेच आदेश जारी केले आहेत. चाफे येथील सुभाष अबू कोकरे यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर महसूल मंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

नियुक्त समितीत ठाणे व सिंधुदुर्ग येथील अपर जिल्हाधिकारी, भूमी मर्यादा विषयक उपजिल्हाधिकारी तसेच कोकण आयुक्त कार्यालयातील महसूल तहसीलदारांचा समावेश आहे. समिती संबंधित कागदपत्रांची तपासणी करत असून प्रत्यक्ष चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (महसूल) वैशाली नंदकिशोर इंदाणी यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे की, चाफे येथील अतिरिक्त जमीन वाटप घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच संबंधित काही जमिनींच्या विक्रीसंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे. हा दावा समेटाने निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून विक्री आदेश मिळवण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. या प्रकरणी न्यायालयात सक्षमपणे शासनाची बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

3377070
Share This Article