GRAMIN SEARCH BANNER

रिक्षा अडवल्याच्या वादातून राजापुरात दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

Gramin Varta
191 Views

राजापूर: तालुक्यातील विलये गुरववाडी येथे रिक्षा अडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोयता, कुऱ्हाड आणि लाकडी बांबूचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हिंसक वादामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले आहेत.

पहिल्या गटाचे फिर्यादी संदीप दौलत गुरव (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या चुलत्यांना दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा घेऊन जात असताना गणपत मांडवकर याने त्यांची रिक्षा अडवून शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता गणपत मांडवकर याने घरातून दोन कोयते आणले, तर राजेंद्र मांडवकर याने संदीप यांना पकडून ठेवून मारहाण केली. यावेळी गणपतने संदीप यांच्या डाव्या खांद्यावर कोयत्याच्या मागील बाजूने प्रहार करून दुखापत केली. इतक्यावरच न थांबता, संदीप यांचा भाऊ प्रफुल्ल गुरव तिथे आला असता गणपतने हातात कुऱ्हाड घेऊन ‘तुम्हाला आता ठार मारतो’ अशी धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गणपत आणि राजेंद्र मांडवकर यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, गणपत दत्ताराम मांडवकर (वय ३३) यांनीही प्रतिफिर्याद दाखल केली असून त्यांच्या म्हणण्यानुसार, ते आपल्या पत्नीशी रिक्षाच्या भाड्यावरून बोलत असताना संदीप गुरव आणि प्रफुल्ल गुरव तिथे आले. संदीप गुरव याने हातात लाकडी बांबू घेऊन गणपत आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावर धावून जात त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गणपत यांच्या पाठीवर आणि हाताच्या मनगटावर, तर त्यांची पत्नी वैदेही मांडवकर यांच्या हातावर बांबूने प्रहार करण्यात आले. प्रफुल्ल गुरव याने गणपत यांची मान पकडून त्यांना थापटाने मारहाण केली आणि संदीपने ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून संदीप आणि प्रफुल्ल गुरव यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजापूर पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3212976
Share This Article