रत्नागिरी: शहरानजीकच्या कुवारबाव येथील साईनगर परिसरात घरफोडीच्या उद्देशाने अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या एका सराईत चोरट्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. एकनाथ सीताराम कातकरी (वय २५, रा. तळोजा कातकरवाडी, पनवेल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई ५ मार्च २०२६ रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास एका घराच्या कंपाऊंडमध्ये करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पंकज यशवंत पडेलकर हे पथकासह गस्तीवर असताना त्यांना कुवारबाव येथील साईनगरमध्ये एक तरुण संशयास्पदरीत्या वावरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे घरफोडी करण्यासाठी लागणारे लोखंडी कटर मिळून आले. विशेष म्हणजे, आरोपीकडे तळोजा सेंट्रल जेलचे आयडी कार्ड (मॅन्युअल रजिस्टर नं. ७६८/२०२६) देखील सापडले आहे. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळात स्वतःची ओळख लपवून चोरी किंवा एखादा मोठा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो त्या ठिकाणी वावरत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार पंकज पडेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी एकनाथ कातकरी याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (ड) (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ मार्च रोजी पहाटे सव्वा दोन वाजता ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा चोरटा पनवेल भागातील असून तो रत्नागिरीत कोणत्या उद्देशाने आला होता आणि त्याचे आणखी काही साथीदार आहेत का, याचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
कुवारबाव येथे घरफोडीच्या इराद्याने दबा धरून बसलेला सराईत चोरटा जेरबंद; संशयिताकडून कटर आणि जेलचे आयडी कार्ड जप्त








