महावितरण अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभाराविरोधात आक्रमक उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची महावितरणवर धडक

Gramin Varta
5 Min Read

लांजा: शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, त्यामुळे विस्कळीत होणारा पाणीपुरवठा आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभाराविरोधात लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष व नगरसेवक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नगरसेवकांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना तब्बल दोन तास घेराव घालत जाब विचारला.

लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या वीज खंडिताचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महावितरण अधिकाऱ्यांकडून फोन न उचलणे, नवीन विद्युत खांब उभारण्यास होणारा विलंब तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे रखडल्याबाबतही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील नोकरदार, व्यापारी आणि गृहिणींना वारंवारच्या वीज खंडितीमुळे होत असलेल्या त्रासाची कैफियत त्यांनी मांडली.

मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, पाणी सभापती रफिक (गुल्ल्या) नेवरेकर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, गटनेते योगेश कावतकर, सचिन डोंगरकर,  वैभव जोईल, पंढरीनाथ मायशेट्ये, सिद्धेश भुवड तसेच नगरसेविका श्रद्धा तोडकरी, निलिमा कनावजे, प्रांजल यादव, साक्षी मानकर, सुशीला कांबळे व प्रसाद भाईशेट्ये यांनी सहाय्यक अभियंता कुलकर्णी यांना धारेवर धरले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. नगरपंचायतीमध्ये बैठक घेऊन आणि वारंवार सांगूनही महावितरणने काहीच केले नाही, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्ती काढून जनतेला वेठीस धरले जात आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करता काय? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच लांजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनवर महावितरणच्या ठेकेदार कंपनीकडून विजेचे पोल उभारण्यात आले आहेत. याबाबत गेले दोन महिन्यांपासून वारंवार नगरपंचायतीकडून पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार झाला आहे. त्यामुळे महावितरण हे ठेकेदार कंपनीला मॅनेज झालात का? असं गंभीर प्रश्न मिलिंद लांजेकर यांनी उपस्थित केला.

पाणी सभापती रफिक नेवरेकर आणि यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना सांगितले की, लांजा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरिकांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामध्ये अडचणी येत असतात, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला तरच पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य होईल. पाणीपुरवठा हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने नागरिकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो, यापुढे काळजी घ्या की वीजपुरवठा खंडित होणार नाही जेणे करून पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अन्यथा याचे वाईट परिणाम महावितरण कार्यालयाला भोगावे लागतील असा कडक इशारा रफिक नेवरेकर यांनी दिला.

सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांच्या उत्तराने पूर्ण समाधान न झाल्याने माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी नागरिकांचे फोन न उचलणे तसेच पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहिला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही. विज बिल भरायला एक दिवस उशीर झाला तर सर्वसामान्य नागरिकांची महावितरणकडून वीज कट केली जाते. परंतु सर्विस देताना मात्र तेवढी तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे असे प्रकार सुरु राहिल्यास येणाऱ्या काळात आम्ही वीज बिल देखील भरणार नाही, असे स्पष्टपणे मनोहर बाईत यांनी ठनकावून सांगितले.

त्याचप्रमाणे नगरपंचायतीचे गटनेता योगेश कावतकर यांनी महावितरणचे अधिकारी फोन न उचलल्याचा मुद्दा पुढे आणत जोरदार ताशेरे ओढले. प्रत्येक वेळी नागरिकांचे फोन न उचलणे किंवा फोन बंद करून ठेवणे याच्यावरून योगेश कावतकर यांनी आक्रमक होत महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना जाब विचारला. यावर निलेश कुलकर्णी यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने योगेश कावतकर जास्त आक्रमक झाले आणि यापुढे फोन न उचल्यास त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असे आक्रमक होत सांगितले.

स्वीकृत नगरसेवक सचिन डोंगरकर यांना सहाय्यक अभियंता कुलकर्णी यांनी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने त्यांनी दिलेली प्रश्नांची उत्तरे आणि त्यांची असलेली अडचण लेखी स्वरूपात मागितली. तसेच विजेचे पोल बसवण्यात येणाऱ्या अडचणी काय आहेत? किंवा पोल बसविण्यात ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे का? जे काय असेल ते लेखी द्या असे डोंगरकर यांनी सांगताच सहाय्यक अभियंता कुलकर्णी पूर्णपणे निरुत्तर झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांनी नगरसेवकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराचे समर्पक उत्तरे देता आली नाहीत. तर फोन न उचलने, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर होणारे परिणाम असो अशा विविध प्रश्नां संदर्भात सहाय्यक अभियंता हतबल झालेले दिसून आले. यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ठोस उत्तर नसल्याने उपस्थित उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आक्रमक झाले होते

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *