GRAMIN SEARCH BANNER

पोलादपूर अपघात प्रकरण :  गंभीर जखमी अनिल मरकड यांचेही निधन; सुखी कुटुंब अवघ्या १० दिवसांत उद्ध्वस्त, ८ वर्षांचा चिन्मय झाला पोरका

Gramin Varta
186 Views

दापोली :  येथील कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी अनिल मरकड यांचे काल, ९ जून रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर जवळील हॉटेल बालाजीनजीक ३० मे रोजी झालेल्या भीषण कार अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या अपघातात मरकड यांच्या पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला होता, तर आता अनिल मरकड यांच्या निधनाने त्यांचा ८ वर्षांचा मुलगा चिन्मय याचे पितृछत्रही हरपले असून तो पूर्णपणे पोरका झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे दापोली आणि त्यांच्या मूळ गावी तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह मूळ गाव नगर येथून सुट्टी संपवून दापोलीकडे कारने परतत होते. ३० मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पोलादपूर येथे त्यांच्या क्रेटा गाडीची महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला (कंटेनरला) पाठीमागून भीषण धडक बसली. हा अपघात इतका भयानक होता की कार समोरील वाहनाच्या खाली घुसली. यामध्ये अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा गव्हाणे (स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ सहयोगी अधिकारी म्हणून कार्यरत) आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर मुलगा चिन्मय याच्या हाताला दुखापत झाली होती, त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याची प्रकृती आता सुधारत आहे.

या अपघातात अनिल मरकड यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल त्यांची प्राणज्योत मालवली. मरकड कुटुंबीय दापोली तालुक्यातील जालगाव येथील मंगलभूमी अपार्टमेंट येथे राहत होते. आधी पत्नी आणि मुलगी, अन् आता कुटुंबप्रमुख अनिल मरकड यांच्याही निधनाच्या बातमीने मंगलभूमी अपार्टमेंटमधील सदस्यांसह संपूर्ण परिसरातील नागरिक निःशब्द झाले आहेत. अपघातातून सुदैवाने वाचलेला चिन्मय सध्या नगर येथे आपल्या आजी-आजोबांच्या छत्रछायेखाली राहत असून, त्याच्या डोक्यावरील आई-वडिलांचे हात कायमचे निघून गेल्याने संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3484261
Share This Article