नवी दिल्ली: भारत-चीनदरम्यान सुमारे ३,४८८ कि.मी.च्या प्रत्यक्ष ताबा रेषेचे (एलएसी) रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलाने दुर्गम व हिमाच्छादित सीमेवरील दहा चौक्यांवर फक्त महिला जवानांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महासंचालक प्रवीणकुमार यांनी दिली.
‘एलएसी’वर पुढील बाजू मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ‘आयटीबीपी’ने लडाखमध्ये २०२० च्या चिनी जवानांबरोबरच्या संघर्षांनंतर नवीन सीमा नाके सुरू केले. देशाच्या उत्तर व पूर्व बाजूचे २१५ सीमा नाके ‘एलएसी’वर पुढील भागात घेण्यात आले आहेत. प्रवीणकुमार म्हणाले, की आम्ही ‘एलएसी’वर पुढील किंवा आघाडीची बाजू मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आघाडीवरील सीमा चौक्यांची संख्या आता १८० वरुन २१५ वर नेण्यात आली आहे.
सात नवीन तुकड्यांना तसेच विभागीय मुख्यालय स्थापन करण्यासही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यात ९,४०० जवानांचा समावेश असेल. नजीकच्या भविष्यात आयटीबीपी ‘एलएसी’नजीक अशा आणखी ४१ तुकड्या उभारणार आहे. सुरक्षा आणि समन्वय मजबूत करण्याचा यामागील उद्देश असेल. या उपक्रमात महिला जवानांचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने आयटीबीपी ‘एलएसी’वरील दहा सीमा चौक्यांवर फक्त महिला जवानांना नियुक्त करणार आहे.
त्यापैकी लडाखमधील लुकूंग आणि हिमाचल प्रदेशातील थांगी येथे फक्त महिला जवानांच्या सीमा चौक्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील टप्प्यात ‘एलएसी’वरील आघाडीच्या भागात अशा आणखी आठ सीमा चौक्या सुरू केल्या जातील. आयटीबीपीच्या प्रशिक्षण संस्थांची पुनर्रचना केली जाईल आणि जवानांना पाच प्रकारची नवीन कौशल्ये शिकविणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
भारत-चीनदरम्यान ‘एलएसी’वर फक्त महिला जवानांचे तपासणी नाके





