आंबा घाट दरोडा: अटकेतील सातही आरोपींना पोलीस कोठडी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

देवरुख: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दख्खन ते आंबा घाट दरम्यान प्रवाशाची गाडी अडवून शस्त्राचा धाक दाखवत २५ हजार रुपये लुटल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी सात आरोपींना जेरबंद केले असून न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी अटक केलेल्या पाच आरोपींना पाच दिवसांची, तर शनिवारी पकडलेल्या दोन फरार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणातील एका अद्याप फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलीस कसून घेत आहेत.

९ एप्रिल २०२६ रोजी ही लुटमारीची घटना घडली होती, ज्यामध्ये आरोपींनी चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुटले होते. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०९ (४), ३१० (१), २०४, ११२, १४० (२), १२७ (२), ११५ (२) आणि ३५१ (४) अन्वये ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने वेगाने चक्रा फिरवत प्रथम फरहान रशिद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) आणि भूषण बिपेंद्र सावंत (२६) या पाच जणांना बेड्या ठोकल्या.

या कारवाईनंतर फरार असलेल्या उर्वरित तीन आरोपींपैकी अरबाज मजीद बांगी (३१, रा. मजगाव) आणि शार्दूल सुनील किर (२४, रा. सोमेश्वर) या दोघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भट कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात प्रमोद वाघाटे, शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव आणि प्रशांत साळुंखे यांचा समावेश होता. महामार्गावर प्रवाशांना धमकावून लुटणाऱ्या या टोळीच्या अटकेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *