दापोली : विसापूर येथे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

दापोली: तालुक्यातील विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये पडून एका ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी उघडकीस आली. लक्ष्मी सहदेव भानत (रा. सोवेली चव्हाणवाडी, ता. दापोली) असे मृत वृद्धेचे नाव आहे. या घटनेमुळे सोवेली परिसरात शोककळा पसरली असून दापोली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत लक्ष्मी भानत या वयोवृद्ध होत्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त होत्या. आजारपणामुळे त्या गेल्या दोन दिवसांपासून नैराश्यात होत्या आणि सतत डोके धरून बसत होत्या. गुरुवारी, ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्या घरात कोणालाही न सांगता बाहेर पडल्या होत्या. त्या घरी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. यावेळी घरापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीजवळ जाऊन पाहिले असता, लक्ष्मी भानत या विहिरीच्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले.

विहिरीच्या पाण्यात त्या उताण्या स्थितीत तरंगत असल्याचे पाहून ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रविकांत गोविंद भानत यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. आजारपणाला कंटाळून हा अपघात घडला असावा की अन्य काही कारण आहे, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *