GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : शांतिनगर परिसरात दिवसाढवळ्या तीन घरांवर चोरट्यांचा डल्ला; आलिशान कारमधून आलेल्या टोळीने उडवली खळबळ

Gramin Varta
175 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या शांतिनगर परिसरात मंगळवारी दुपारच्या वेळेत चोरट्यांनी धाडसी कारवाया करत तीन ठिकाणी घरफोड्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही तासांच्या कालावधीत सलग तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने पोलिस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शांतिनगर बसस्टॉप परिसरातील एका इमारतीतील बंद सदनिकेवर चोरट्यांनी पाळत ठेवून डाव साधला. घरातील वयोवृद्ध महिला एकट्या असल्याचा फायदा घेत संशयितांनी बाहेरून कडी लावून हालचालींवर मर्यादा आणली. त्यानंतर बंद घराचा कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

घटनेनंतर संबंधित कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता संशयित व्यक्ती आलिशान कारमधून परिसरात आल्याचे निदर्शनास आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

याचदरम्यान, शांतिनगरलगतच्या र्साळवाडी आणि सावंतनगर भागातही घरफोडीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चोरीची पद्धत आणि वेळ पाहता या तिन्ही घटना एकाच टोळीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सलग घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेजमधील संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोड्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3484341
Share This Article