गुहागर : शैक्षणिक क्षेत्रात आपल्या विविधांगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी ठसा उमटवणाऱ्या गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील ‘पीएमश्री स्कूल’ला ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श शाळा पुरस्कार २०२६’ नुकताच जाहीर झाला आहे. केंद्र सरकारच्या पथदर्शी पीएमश्री प्रकल्पासाठी निवड झालेली तालुक्यातील एकमेव प्रशाला असलेल्या या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल आता राज्यस्तरावर घेतली गेली आहे. रविवारी, २९ मार्च २०२६ रोजी निगडी-पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.
वेळणेश्वर प्रशाला ही केवळ तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक मूल्यांची सांगड घालणारी एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जाते. शाळेत डिजिटल व इंटरॅक्टिव्ह क्लासरूम्ससह सुसज्ज आयडियल सेंटर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी राबवले जाणारे विशेष उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे. विशेष म्हणजे, मराठी शाळा टिकवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘बालवाटिका’, प्लास्टिक मुक्त शाळा अभियान, मेडिकल किचन गार्डन आणि सॅनिटरी पॅड वाटपासारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमुळे या शाळेने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
शाळेच्या या यशात विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचाही मोठा वाटा आहे. पहिल्या महिला कराटे ब्लॅक बेल्ट धारक शिक्षिका सुलक्षणा करडे-राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्वसंरक्षण धडे, शिवकालीन मर्दानी खेळांची जपणूक, लक्षवेधी झांज पथक आणि समई नृत्य यांसारख्या कलागुणांमुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य स्तरावर सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तसेच इस्रो-नासा उपक्रम, ब्रिक्स रोबोटिक्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून परदेशातील तज्ञांशी साधलेला संवाद यांसारख्या आधुनिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची पावले जागतिक स्पर्धेत घट्ट पडत आहेत. याच सर्वंकष शैक्षणिक प्रगतीची दखल घेऊन ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, शिक्षिका शैलजा साळे, शिक्षक बिपीन विचारे, बाबासाहेब राशिनकर, सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर, प्रियंका पवार, अंजुम शेख, तेजस्विनी जगताप यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर यांच्यासह वेळणेश्वर ग्रामस्थांनीही या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
गुहागरच्या ग्रामीण भागातील एका शाळेने राज्यस्तरावर मिळवलेल्या या बहुमानामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, प्रशालेवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे






