रत्नागिरी : मरुसागर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या भारत सरकारच्या एका वैज्ञानिक महिलेचा मोबाईल रत्नागिरी रेल्वे स्थानकावर चोरीला गेल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी घडली. झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने हा मोबाईल लंपास केला. पनवेल रेल्वे पोलिसांकडून हा गुन्हा रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील रहिवासी आणि भारत सरकारच्या हवामान विभागात वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री व्ही.पी.एम. श्रीधरण (वय ३५) या २७ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता कोझिकोडे (केरळ) रेल्वे स्थानकाहून १२९७७ क्रमांकाच्या मरुसागर सुपरफास्ट एक्सप्रेसने पनवेलला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या ए-२ कोचमधील सीट क्रमांक ५७ आणि ६० वर बसून प्रवास करत होत्या.
२८ जुलै रोजी दुपारी २ ते ३.१० वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकावर असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने राजश्री श्रीधरण यांच्या झोपेचा फायदा घेतला. त्यांच्या नकळत, सीटवर ठेवलेला १५,००० रुपये किमतीचा निळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेला. या मोबाईलमध्ये ‘व्हीआय’ (VI) आणि ‘एअरटेल’ (Airtel) कंपनीची सिमकार्ड होती. मोबाईलचा मॉडेल नंबर आणि IMEI नंबर मात्र उपलब्ध नाही.
या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातून हा गुन्हा रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, घटनेची नोंद २८ जुलै २०२५ रोजी रात्री १०.२७ वाजता करण्यात आली आहे. अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून वैज्ञानिक महिलेचा मोबाईल चोरीला
