सरपंच आणि पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांसमवेत आमदार किरण सामंत यांनी घेतली बैठक
रत्नागिरी, (प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाळा पंचक्रोशीतील गावांच्या विविध प्रश्नांवर आमदार किरण सामंत यांनी लक्ष घालून ते सोडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह सरपंच आणि पदाधिकाऱ्यांची पाली येथे बैठक घेऊन अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाटद- खंडाळा परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या गावातील समस्यांबाबत आमदार किरण सामंत यांना निवेदने दिली होती. यामध्ये प्रामुख्याने महावितरणशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. या निवेदनांची गंभीर दखल घेत आमदार सामंत यांनी त्वरित बैठक आयोजित केली. या बैठकीला वाटद- खंडाळा परिसरातील सरपंच, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमध्ये ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. आमदार सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले. विशेषतः महावितरणच्या प्रश्नांवर त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार सामंत यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.