रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला, पण कर्तव्य बजावत असलेल्या दोन आरपीएफ जवान आणि एका रेल्वे विक्रेत्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले. ही थरारक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी एलटीटी-सावंतवाडी एक्स्प्रेस रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दाखल झाली. रेल्वे पूर्णपणे थांबण्याआधीच, एका तरुणाने घाईघाईत उतरण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न अंगलट आला आणि त्याचा तोल जाऊन तो रेल्वेच्या खाली खेचला जाऊ लागला.
हे दृश्य पाहताच प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी वेगाने त्या तरुणाला बाजूला ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. या तिघांच्या समयसूचकतेमुळे एक मोठा अपघात टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण हा गोळप, रत्नागिरी येथील रहिवासी आहे. रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने त्याला तात्काळ प्रथमोपचार दिले आणि पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची गंभीर दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तात्काळ या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांनी रणजीत सिंह, महेंद्र पाल आणि वीर सिंग यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले असून, ते त्यांना लगेच प्रदान करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांनी नेहमी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.