मराठमोळ्या एडिटरने तब्बल 55 तासांच्या फुटेजमधून बनवला चित्रपट
मुंबई : 1976 सालचे फिल्मफेअर पुरस्कार… ‘शोले’ नावाचे वादळ तब्बल 10 नामांकनांसह मंचावर होते. पण, त्या रात्री सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक किंवा खलनायकाचा पुरस्कार ‘शोले’च्या झोळीत पडला नाही.
त्या महाकाय चित्रपटाला पुरस्कार मिळाला तो फक्तएकच, आणि तो जिंकला होता एका मराठी माणसाने, ज्यांच्या धारदार कात्रीने भारतीय सिनेमाचा इतिहास घडवला. त्यांचे नाव होते संकलक (एडिटर) माधव शिंदे (एम. एस. शिंदे).
‘शोले’चे नाव घेतले की, डोळ्यासमोर येतात जय-वीरू (अमिताभ बच्चन, धर्मेंद्र), गब्बर (अमजद खान) आणि ठाकूर (संजीवकुमार). पण, या कलाकारांच्या अभिनयाला आणि रमेश सिप्पींच्या दिग्दर्शनाला एका सूत्रात बांधणारे खरे शिल्पकार होते संकलक (एडिटर) माधव अर्थात एम. एस. शिंदे. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘शोले’साठी तब्बल 3 लाख फूट लांबीचे (सुमारे 55 तासांचे) फुटेज चित्रित केले होते. हा कच्च्या फुटेजचा डोंगर होता. या प्रचंड रिळच्या पसार्यातून एक सुसूत्र, वेगवान आणि साडेतीन तासांचा चित्रपट कोरणे हे एक अशक्यप्राय आव्हान होते. हे आव्हान एम. एस. शिंदे यांनी आपल्या संकलन कौशल्याने पेलले. ठाकूरचे हात कापण्याचा थरार, जय-वीरूची मैत्री, आणि गब्बरची दहशत… हे सर्व पडद्यावर जिवंत झाले, ते शिंदे यांच्या अचूक संकलनामुळे. प्रत्येक सीनला योग्य वेळ आणि लय देऊन त्यांनी कथेला एका क्षणासाठीही भरकटू दिले नाही. त्यांनी केवळ अनावश्यक भाग कापला नाही, तर प्रत्येक फ्रेमला एक अर्थ दिला.
पन्नास वर्षांनंतरही आज शोलेच्या ब्लॉक ब्लस्टर यशाचे श्रेय नेहमीच कलाकार आणि दिग्दर्शकांना दिले जाते; पण ज्यांच्यामुळे हा चित्रपट एक अजरामर कलाकृती बनला, ते एम. एस. शिंदे मात्र कायम पडद्यामागेच राहिले. त्यांचा तो एकमेव फिल्मफेअर पुरस्कार हा त्यांच्या या अद़ृश्य, पण तितक्याच महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान होता.
शंभरहून अधिक चित्रपटांचे संकलन
माधव शिंदे यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1929 रोजी मुंबईत झाला. 28 सप्टेंबर 2012 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 1960 – 1995 या काळात त्यांनी 100 हून अधिक बॉलीवूड चित्रपटांत संकलक म्हणून काम केले. त्यांच्या कामांच्या यादीत राज (1967), ब्रह्मचारी (1968), शान (1980), शक्ती (1982), रजिया सुलतान (1983), सोहनी महिवाल (1984), सागर (1985) आणि चमत्कार (1992) असे काही यशस्वी चित्रपट समाविष्ट आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘जमाना दीवाना’ (1995) होता, ज्यामध्ये शाहरूख खान अभिनीत होता. चित्रपटांसोबतच, शिंदे 1986 मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेल्या हिंदी मालिका ‘बुनियाद’चे संकलक देखील होते.