खेड: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, बोरघर गावाजवळ मंगळवारी दुपारी एका भरधाव कारला अपघात झाला. मुंबईहून सिंधुदुर्गला जात असलेल्या या कारमध्ये पाच प्रवासी होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
गेल्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक मोठा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच, पुन्हा अपघात झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.