रत्नागिरी: रत्नदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी जसमिक केहर सिंह (वय २९, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी, मूळ रा. फतेहाबाद, हरियाणा) याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयाने या प्रकरणी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
२९ जून रोजी रत्नदुर्ग किल्ल्याच्या सनसेट पॉईंटजवळील कठड्यावरून २८ वर्षीय सुखपित धालिवाल हिने उडी घेत आत्महत्या केली होती. घटनेनंतर तिच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, सुखपित आणि जसमिक यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे नमूद केले होते. तसेच, जसमिकने तिच्याशी खोट्या प्रेमाचे नाटक करून दुसऱ्या मुलीशी लग्न निश्चित केल्याने तिच्यावर मानसिक दबाव आला आणि त्यामुळे तिने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला, असा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी जसमिकविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अटकेची शक्यता लक्षात घेता जसमिकने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. सचिन पारकर यांनी बाजू मांडताना सांगितले की, मृत तरुणीच्या वडिलांची तक्रार पूर्णपणे खोटी असून खोडसाळ स्वरूपाची आहे. मणिपालमध्ये बँकिंग प्रशिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. यानंतर सुखपितने लग्नाची मागणी केली होती; मात्र, आपण आधीच दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिला स्पष्टपणे सांगितले होते, असे जसमिकने न्यायालयात स्पष्ट केले.
या सर्व बाजूंवर विचार करत सत्र न्यायालयाने जसमिक सिंहला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
रत्नदुर्ग आत्महत्या प्रकरण : प्रियकराचा अटकपूर्व जामीन मंजूर
