ओरोस : सिंधुदुर्गची जलकन्या व राष्ट्रीय जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे हिची सिंगापूर येथे होणार्या जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिव-दमण येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सागरी जलतरण स्पर्धेत तिने दोन पदके मिळवत महाराष्ट्राचा झेंडा फडकवला होता. या घवघवीत यशानंतर आता जागतिक सागरी जलतरण स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
पूर्वा गावडे ही सद्या पुणे -बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे प्रशिक्षण घेत असून शिक्षणही त्याच ठिकाणी घेत आहे. नुकतीच ती बारावी उत्तीर्ण झाली. तिने जलतरण स्पर्धेमध्ये आपल्या यशात सातत्य ठेवले आहे. आतापर्यत तिने राज्यस्तर व तसेच ओरिसा, अहमदाबाद, चेन्नई, गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार कामगिरी करत अनेक मेडल मिळविली आहेत. या कामगिरीच्या जोरावरच तिची दिव-दमण येथे झालेल्या खेलो इंडिया मध्ये सागरी जलतरण स्पर्धेत निवड झाली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन मेडल पटकावली होती.
‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील यशानंतर जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी बेंगलोर येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यातही यश मिळविल्यानंतर पूर्वाची सिंगापूर येथे 13 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत होणार्या 5किलोमीटरच्या जागतिक जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर आता ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पूर्वाने आतापर्यत राष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशात राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर व पुणे येथील राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
‘सिंधु जलकन्या’ पूर्वा गावडेची जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Leave a Comment