लांजा : तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले, ब वर्ग पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आलेल्या माचाळ येथे लांजा तालुका पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
माचाळ हे गाव समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर आहे. या गावातील वातावरण आल्हाददायक व नैसर्गिकदृश्ट्या उत्तम असल्याने दिवसेंदिवस माचाळकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. पावसाळ्यात माचाळचे वातावरण हे अवर्णनीय तसेच निसर्गरम्य असल्याने या गावाला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
लांजा तालुका पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा बुधवार १६ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये माचाळ गावचे ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
दरम्यान, यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, कृषी विस्तार अधिकारी नारायण कटरे, रोशनी जाधव, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) संजय लोखंडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी शैलेश आंबेरकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रमेश कुरणे तसेच मराठी पत्रकार परिषद लांजा शाखेचे सिराज नेवरेकर, रवींद्र साळवी, संजय साळवी, संतोष कोत्रे, प्रवीण कांबळे, नसिर मुजावर आदींसह सरपंच संघटना आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
लांजा पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा पर्यावरण पूरक उपक्रम; माचाळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण
