धामणी : गावातील ग्रामदैवत वाघजाई नवलाई देवीचा नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गेली अनेक वर्षे अखंडपणे चालू असलेल्या या उत्सवाला ग्रामस्थांची एकत्रित परंपरा आणि श्रद्धेचा ठसा आहे.
उत्सवाच्या नऊही दिवसांमध्ये दररोज रात्री देवीची आरती व भजनाचा कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने पार पडतो. यामध्ये महिला, पुरुष, तरुण आणि वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. विशेष म्हणजे जाखडी या पारंपरिक लोककलांचे सादरीकरणही उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते.
देवीचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले असून, देवीच्या गाभाऱ्यात फुलांची सुरेख सजावट करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी देवीला विविध रंगांच्या आकर्षक वस्त्रांचा साज चढविला जातो. या सर्व सजावटीतून ग्रामस्थांचा भक्तीभाव आणि कलात्मकता स्पष्टपणे दिसून येतो.