वॉशिंग्टन डीसी ते केनेडी स्पेस सेंटरपर्यंतचा ज्ञानप्रवास
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील २० विद्यार्थ्यांनी नुकत्याच पूर्ण केलेल्या अमेरिका दौऱ्यात शिक्षण आणि ज्ञानाची नवी क्षितिजे शोधली. वॉशिंग्टन डीसीपासून थेट नासाच्या केनेडी स्पेस सेंटरपर्यंतच्या या प्रवासात त्यांनी विज्ञान, इतिहास आणि अमेरिकन संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
अमेरिका भेटीची सुरुवात राजधानी वॉशिंग्टन डीसी येथून झाली. स्मिथसोनियन एअर अॅण्ड स्पेस म्युझियममध्ये त्यांनी विमान आणि अंतराळयानांच्या इतिहासाचा मागोवा घेतला. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये डायनासोरचे सांगाडे आणि नैसर्गिक जगाचे विस्मयकारक दर्शन घडले.
व्हाइट हाऊस, अमेरिकन संसद भवन, आणि लिंकन मेमोरियलसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्यांनी अमेरिकेच्या प्रशासकीय व राजकीय इतिहासाची माहिती घेतली.
नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये थरारक अनुभव
वॉशिंग्टननंतर विद्यार्थ्यांनी फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली. तेथे त्यांनी डीप स्पेस ट्रॅव्हल सिम्युलेटरमध्ये अंतराळ प्रवासाचा थरारक अनुभव घेतला. स्पेस शटल अॅटलांटिस आणि हबल दुर्बिणीसारख्या ऐतिहासिक अंतराळ यानांचे प्रत्यक्ष दर्शन हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला.
शटल लॉंच एक्स्पिरियन्सद्वारे शटल प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, ज्यामुळे त्यांच्या मनात अंतराळ संशोधनाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली.
या दौऱ्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य दिले होते. जिल्हा नियोजन समितीकडून या दौऱ्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
हा दौरा रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सहल नव्हती, तर विज्ञानाचे महत्त्व आणि जागतिक इतिहासाचे ज्ञान मिळवण्याची एक अनमोल संधी ठरली. या भेटीमुळे त्यांच्या मनात विज्ञान, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन विकसित होण्यास मोठी मदत झाली आहे.
रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी नासात घेतला विज्ञानाचा रोमांचक अनुभव!
